प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी अतूट नाते असलेल्या तासगाव येथील ऐतिहासिक श्रीगणपती मंदिरात यंदाचा भाद्रपद मासोत्सव धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.शके १९४८ / इ.स. २०२६ मधील हा उत्सव शनिवार, दि. १२ सप्टेंबर ते बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.मराठा साम्राज्याच्या इ.स. 1781 ते 1795 या कालखंडातील सेनापती श्रीमंत परशुराम (भाऊ) पटवर्धन यांनी कसबा/प्रांत पातळीवर मराठा साम्राज्यात प्रतिष्ठापित केलेल्या सार्वजनिक गणपतींपैकी तासगाव येथील श्रीगणपती मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या मंदिरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या २४७ व्या सलग व अखंड वार्षिक भाद्रपद मासोत्सवानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
*दररोज धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी*
महोत्सवाच्या कालावधीत दररोज श्रावणमास अनुष्ठानांतर्गत पठण व सांगता,तसेच दुपारी १२ वाजता श्रींची षोडशोपचारपूर्वक महापूजा पं दीपक पां जोशी आणि पं अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्याचबरोबर ह.भ.प. कीर्तनकलाविभूषण गजाननबुवा वाठारकर यांचे नारदीय कीर्तन दररोज सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत होणार आहे.
तसेच गौरी हत्तीणीच्या नेतृत्वाखाली सुशोभित ‘छबिना’ दररोज सायंकाळी ६.१५ वाजता काढण्यात येणार आहे.त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
*सतारवादनाने रंगणार रविवारचा कार्यक्रम*
रविवार, दि.१३ सप्टेंबर रोजी रात्री 7 वाजता पं.राजेंद्र परशुराम पटवर्धन यांचे शास्त्रीय सतारवादन होणार आहे.तबला साथ तबला विशारद पं.विनायक हसबनीस करणार आहेत.धार्मिक उत्सवासोबत शास्त्रीय संगीताची मेजवानी भाविक व रसिकांना अनुभवता येणार आहे.
*गणेश चतुर्थीनिमित्त मंत्रजागर*
सोमवार, दि. १४ सप्टेंबर, गणेश चतुर्थीनिमित्त सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पं.अनंतशास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रजागर आयोजित करण्यात आला आहे. श्रींच्या उपासनेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
*ऋषिपंचमीला श्रींची रथयात्रा*
मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी ऋषिपंचमी दिवशी विशेष ‘श्रींच्या रथयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. तासगावच्या पारंपरिक धार्मिक उत्सवातील या सोहळ्याकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे.
*ललितांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता*
बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता श्रींच्या ललितांचे कीर्तन पं.गजाननबुवा वाठारकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाने यंदाच्या भाद्रपद मासोत्सवाची सांगता होणार आहे.
महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा आणि पारंपरिक धार्मिक वारसा वृद्धिंगत करावा,असे आवाहन विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केले आहे.
‘आपले नाते’
या भाद्रपद मासोत्सवाचे आयोजन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.राजेंद्र परशुराम पटवर्धन हे अध्यक्ष असून,सौ. सितारा राजेंद्र पटवर्धन सचिव तर राहुल राजेंद्र पटवर्धन सदस्य आहेत.त्यांच्या वतीने भाविकांना उत्सवातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्वच कार्यक्रमाचे नियोजन मंदिराचे प्रमुख सरव्यवस्थापक पवनसिंह कुडमल,व्यवस्थापक अथर्व अनंत जोशी,अशोक कुंभार आणि सर्व सहकाऱ्यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या