सांगली, दि. 11: महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत विविध कृषी व कृषीपूरक प्रशिक्षण उपक्रमांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण, कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच शेतकरी उत्पादक कंपनीतील सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या अंतिम तारखा पुढीलप्रमाणे आहेत-
शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026. कागदपत्रांच्या हार्ड कॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे कार्यालयास पाठविण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2026.
ड्रोन पायलट प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 असून ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सारथी संस्थेच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात.
मधुमक्षिकापालन तसेच कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026. कागदपत्रांच्या हार्ड कॉपी 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत सारथीच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात.
कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर 10 दिवसांच्या आत कागदपत्रांच्या हार्ड कॉपी संबंधित विभागीय कार्यालयास सादर कराव्यात.
प्रशिक्षणासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहिती संबंधित जाहिरात व माहितीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
अधिक माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना फलकास भेट द्यावी. सारथी संकेतस्थळ: https://sarthi-maharashtra.gov.in/ तसेच शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी https://sarthi.mahamcdc.com/ या संकेतस्थळास भेट द्यावी.
या प्रशिक्षणांमुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणांचा लाभ लक्षित गटातील पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्राचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या