सांगली : अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आष्टा येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आयोजित सांगली विभागीय बॅडमिंटन पुरुष स्पर्धेत चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग पाचव्या वर्षी विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या विजयामुळे चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाची अंतरविभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य नारायण आपटे तसेच जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. शार्दुल ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने आणि दत्तात्रय मुळूक यांनी संघाला मोलाचे मार्गदर्शन केले. सलग पाचव्यांदा मिळविलेल्या या विजेतेपदाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या