प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : सांगली येथील उपळावीकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत वाटेगाव येथील वाचनहिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वाचनालयास तब्बल ५०० पुस्तके भेट देत वाचन चळवळीला हातभार लावला.
सुनील उपळावीकर, विजय उपळावीकर, मीना उपळावीकर, मंगला उपळावीकर, अथर्व उपळावीकर, श्रुती उपळावीकर आणि सफल उपळावीकर यांनी स्वतःच्या वाचनासाठी खरेदी केलेली धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक पुस्तके समाजाच्या उपयोगी यावीत आणि समाजातील विविध घटकांना त्यांचा लाभ मिळावा, या उद्देशाने वाचनहिताय वाचनालयास भेट दिली.
वाचनहिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वाटेगाव ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून वाचन संस्कृती, ग्रंथालय, प्राथमिक शाळा आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहे. वाचन चळवळीच्या माध्यमातून विविध ठिकाणी वाचन सभा घेण्याबरोबरच प्राथमिक शाळांमध्ये बालसाहित्याची ग्रंथालये निर्माण करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषद मराठी शाळा वाचाव्यात, या उद्देशाने ‘पुण्यवान मराठी शाळा अभियान’ अंतर्गत शाळा बचाव मोहीमही राबविण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे विविध मेळावे घेऊन त्यांच्या प्रश्नांवरही संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते. ‘वृक्ष संगोपन संकल्प’ या उपक्रमांतर्गत जन्मलेल्या मुलीच्या नावे वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा उपक्रमही राबविला जातो. अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्था कार्यरत आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वेदपाठक व उपाध्यक्ष एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था सामाजिक आणि वाचन क्षेत्रात विविध उपक्रम राबवत यशाची शिखरे पार करत आहे.
संस्थेचे सामाजिक कार्य पाहून उपळावीकर कुटुंबीयांनी वाचनालयास पुस्तके भेट देत वाचनहिताय संस्थेच्या कार्यात ज्ञानाची आणखी भर घातली आहे.
वाचनहिताय संस्थेचे सहकारी दत्तात्रय पंडित यांच्याकडे सुनील उपळावीकर यांनी पुस्तके सुपूर्त केली. यावेळी वाचनहिताय संस्थेच्या वतीने दत्तात्रय पंडित यांनी सुनील उपळावीकर यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मानित केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वेदपाठक यांनी उपळावीकर कुटुंबीयांचे आभार मानत त्यांनी दाखवलेल्या सामाजिक भानाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या