प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित भक्तिमय सोहळ्यात ‘रासलीला इन नंदनवन’ या विशेष कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील बालकलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी गुरुवर्य श्री सद्गुरू प्रभाकरबुवा बोधले महाराज यांचे श्रीकृष्ण कथा व आध्यात्मिक प्रवचन झाले. श्रीकृष्णाचे जीवन हे प्रेम, भक्ती, कर्म, धर्म आणि जीवनमूल्यांची शिकवण देणारे आहे, असे त्यांनी सांगितले.
गुरुवर्य प्रभाकरबुवा बोधले महाराज म्हणाले...
“श्रीकृष्ण जन्माष्टमी हा केवळ उत्सव नसून आपल्या जीवनात भक्ती, संस्कार आणि सदाचार रुजविण्याचा पवित्र दिवस आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून कर्म करण्याचा आणि कर्तव्यावर श्रद्धा ठेवण्याचा संदेश दिला. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सत्य, धर्म आणि कर्तव्याचा मार्ग सोडू नये.
आजच्या काळात आपल्या मुलांना आधुनिक शिक्षणासोबतच संस्कार, भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची ओळख करून देणे आवश्यक आहे. राधा-कृष्णाच्या निरागस प्रेमातून प्रेम, त्याग आणि भक्तीचा संदेश मिळतो. प्रत्येक कुटुंबात प्रेम, एकोपा आणि सद्भावना नांदली, तर तेच खरे श्रीकृष्णाचे आगमन होय.
श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला जगण्याची नवी दिशा देतो. कर्म प्रामाणिकपणे करा, फळाची चिंता करू नका आणि संकटसमयी धैर्याने उभे रहा, हा श्रीकृष्णाचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा.”
कार्यक्रमाच्या शेवटी राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेतील बालकलाकारांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व बालकांचे विशेष कौतुक करण्यात आले. उपस्थित भाविकांनी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमात भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष राजेश देवगिरी, पंच मंडळाचे सदस्य, महिला मंडळ, युवक समिती, तरुण संघाचे पदाधिकारी सदस्य व समाज बंधू भगिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या