सांगली प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील चौथ्या DPR मधील ५८ लाभार्थ्यांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. पात्र प्रत्येक लाभार्थ्याला शासनाच्या नियमानुसार एकूण २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे.
घरकुलाच्या बांधकामाची प्रगती लक्षात घेऊन शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार-लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.
बांधकामाच्या टप्प्यानुसार मिळणार निधी
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम नियमानुसार पूर्ण करावे. बांधकामाच्या प्रगतीनुसार आवश्यक कागदपत्रे व बांधकामाची सद्यस्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाच्या नियमानुसार अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
विकास शुल्कात सवलत
या योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांच्या बांधकाम परवानगीतील विकास शुल्क शासनाकडून माफ करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी केले.
एजंट, मध्यस्थांपासून सावधान
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणत्याही खाजगी एजंट, मध्यस्थ अथवा अनधिकृत व्यक्तीशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. योजनेच्या अनुषंगाने कोणतेही काम करण्यासाठी किंवा अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी थेट सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजना कक्षातील अधिकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांशीच संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
योजना मंजुरी, अनुदान, बांधकाम परवानगी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास त्याची माहिती तातडीने महापालिका प्रशासनाला द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
“शासनाच्या योजनेचा लाभ हा लाभार्थ्यांचा हक्क आहे. त्यासाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. लाभार्थ्यांनी अधिकृत महापालिका यंत्रणेशी थेट संपर्क साधूनच आवश्यक कार्यवाही करावी,” असे आयुक्त संजिता महापात्र यांनी सांगितले.
पात्र नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करावा
यापुढे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांनी शासनाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रांसह प्रधानमंत्री आवास योजना कक्षाशी संपर्क साधून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करताना पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, बांधकामासंबंधीच्या अटी व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती अधिकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घ्यावी. अपूर्ण अथवा चुकीची माहिती देऊन अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले.
पदाधिकारी, अधिकारी उपस्थित
मंजुरीपत्र वाटपाच्या कार्यक्रमास महापालिका आयुक्त संजिता महापात्र, स्थायी समिती सभापती अतुल माने, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाजकल्याण समिती सभापती गीता पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती बानू जमादार, परिवहन समिती सभापती प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते मैनुद्दीन बागवान, समाजविकास अधिकारी नितीश माळी, समाजविकास तज्ञ सागर शिंदे, अधीक्षक राजेंद्र आवळे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या