मिरज : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज येथे गणेशोत्सवानिमित्त "भक्तीला आकार देत – पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा" उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. या उपक्रमात पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद अनुभवला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री. देवान्क्ष गिरीश गुरव यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर रफिक तांबोळी यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच उप मुख्याध्यापिका पद्मा सासनूर यांनी श्रीदेवी कुल्लोळी आणि रुबीना नदाफ यांचे स्वागत केले.तसेच समन्वायिका अश्विनी येळकर या कार्यक्रमावेळी उपस्थित होत्या
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील कलाशिक्षकांनी केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे श्री. देवान्क्ष गिरीश गुरव (मिरज) यांचा परिचय करून देण्यात आला. त्यांनी शिल्पकला व मॉडेलिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असून ललित कला आणि फ्रीलान्सिंग क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शिल्पकला, क्ले मॉडेलिंग, भित्तिचित्रकला, चित्रकला, रेखाचित्र, व्हिज्युअल डिझाइन आणि विविध सानुकूल कलाकृती या क्षेत्रांतील त्यांचे कौशल्य उल्लेखनीय आहे.
कार्यशाळेदरम्यान श्री. गुरव यांनी पालकांना मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली. मूर्ती घडविताना योग्य प्रमाण, आकार, नाजूक कलाकुसर, रंगसंगती आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पालकांनीही अत्यंत उत्साहाने स्वतःच्या हस्ते श्री गणेशमूर्ती तयार करून आपल्या कलागुणांचे सुंदर दर्शन घडविले.या कार्यशाळेमुळे पालकांना केवळ कलाकौशल्य शिकण्याची संधी मिळाली नाही, तर पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला. रासायनिक मूर्तींऐवजी मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा स्वीकार करून निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या सर्व पालकांचे अभिनंदन करण्यात आले. भक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील ,विश्वस्त ॲड .वीरेंद्र पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या