प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन प्राण गमावलेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथील कै. शेखर पावसे यांच्या कुटुंबीयांनी ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत भावनिक आवाहन केले आहे. “ध्वनीप्रदूषणामुळे आमच्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग इतर कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटसारख्या धोकादायक यंत्रणांवर प्रशासनाने तात्काळ कठोर निर्बंध घालावेत,” अशी कळकळीची मागणी शेखर यांचे वडील सुखदेव पावसे यांनी केली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तसेच समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने सांगलीचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ध्वनी व लेझर प्रदूषणावर कठोर कारवाई करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डीजेच्या तीव्र आवाजामुळे शेखर सुखदेव पावशे (पावसे) या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सप्टेंबर २०२३ मध्ये तासगाव (सांगली) येथे घडली होती.
सर्व धर्मीय सण,वाढदिवस,विवाह समारंभ तसेच विविध कौटुंबिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे-डॉल्बीचा सर्रास वापर केला जात आहे.त्याचबरोबर डोळ्यांवर व शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या लेझर लाईटचाही वापर वाढला आहे. या कर्णकर्कश आवाजाचा आणि प्रखर प्रकाशाचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,रुग्ण तसेच पशू-पक्षी यांच्यावर होतो.कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांच्या आरोग्यालाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो,असा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला.
कवठेएकंद येथे काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून देताना पावसे कुटुंबीयांनी प्रशासनाला भावनिक साद घातली.डीजेच्या अतितीव्र आवाजामुळे शेखर पावसे या कुटुंबातील कर्त्या तरुणाचा जीव गेला. एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेला.त्यामुळे अशी घटना पुन्हा घडण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,अशी मागणी करण्यात आली.
“आमच्यावर जे दु:ख कोसळले, ते दुसऱ्या कोणत्याही आई-वडिलांच्या वाट्याला येऊ नये. प्रशासनाने डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर कठोर निर्बंध घालून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे सुखदेव पावसे यांनी सांगितले.यावेळी अंनिसचे कार्यकर्ते डॉ.संजय निटवे, डॉ.सविता अक्कोळे,राहुल थोरात, जगदीश काबरे,आशा धनाले,त्रिशला शहा,वासुदेव गुरव, अमित ठकार, कोडींबा कांबळे, शोभा मधाळे, चंद्रकांत वंजाळे, अविनाश कांबळे, दिगंबर कांबळे, अमर खोत आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या