प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 8 : ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सांगली जिल्ह्यात जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर एकूण 15 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी यामध्ये जिल्ह्यातील युवक-युवती, उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी एक हजार रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग, कंपनी व आस्थापनाने रिक्त पदांची नोंदणी करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. विविध औद्योगिक आस्थापना, उद्योग, कंपन्या व नियोक्त्यांकडील उपलब्ध रिक्त पदांची माहिती संकलित करून त्यांच्या मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार पात्र व कौशल्यधारक रोजगार इच्छुक उमेदवार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात पुढील ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. (1) सांगली इंडस्ट्रियल स्कूल, प्रा. आय.टी.आय., सांगली, (2) राजारामबापू पाटील प्रायव्हेट आय.टी.आय. ईश्वरपूर, (3) व्यंकटेश्वरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेठ, (4) लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विटा, (5) विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय, शिराळा, (6) श्री. राजशेखर रामराव पाटील महाविद्यालय, सावळज, (7) पलुस शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस, (8) सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत, (9) शिक्षण प्रसारक संस्था, कवठेमहांकाळ, (10) श्रीमती चंपाबाई बालचंद शहा महिला महाविद्यालय, सांगली (11) श्रीमती सुलोचना भट महिला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कुंडल, (12) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी परिसर, कडेगाव, (13) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आटपाडी, (14) एम. जी. जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसे, (15) पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव.
या रोजगार मेळाव्यामध्ये Non-Matric, SSC, HSC, Graduate, Post Graduate, ITI, Diploma, BE तसेच विविध तांत्रिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत. विविध उद्योग व आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत, निवड प्रक्रिया व पुढील नियुक्तीची कार्यवाही संबंधित आस्थापनांमार्फत करण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारपूर्व तयारीचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये CV / Resume तयार करणे, प्रभावी स्वपरिचय, मुलाखत कौशल्य, Mock Interview, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेची तयारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. ०७ ते १० सप्टेंबर २०२६ तसेच दि. २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रोजगारपूर्व तयारी प्रशिक्षणाची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. रोजगार इच्छुक युवक-युवतींनी या मोफत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली (दूरध्वनी : ०२३३-२९९०३८३) येथे संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या