प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारने केवळ 3 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. उर्वरित तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सरकारकडे निधी नाही का? सरकारची तिजोरी रिकामी झाल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याची टीका भाजप एस.सी. मोर्चाचे राज्य सरचिटणीस उमेश कारजोळ यांनी केली.
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कारजोळ यांनी म्हटले आहे की, विजयपूर, निडगुंदी आणि कोल्हार या 3 तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र इंडी, चडचण, ताळीकोटे यासह जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्येही दुष्काळी परिस्थिती आहे. पिके हाताशी न आल्याने शेतकरी चिंताजनक परिस्थितीत सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधानसौधामध्ये दुष्काळ निवारणाची कामे हाती घेण्यासाठी सरकारकडे निधीची कमतरता नसल्याचे सांगितले होते. मात्र आता केवळ काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राजस्थानमधील जैसलमेरनंतर सर्वाधिक दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयपूर जिल्ह्यातील केवळ 3 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करून उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार धावून येणार नसेल, तर सरकार असण्याचा काय उपयोग, असा सवालही कारजोळ यांनी उपस्थित केला. अवैज्ञानिक आर्थिक धोरणांमुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली असून दुष्काळ निवारणाची कामे करण्यासाठीही सरकारकडे निधी नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी खेळ करू नये. विजयपूर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावेत. तसेच राज्यातील इतर भागांतील आवश्यक तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून संपूर्ण शेतकरी वर्गाच्या हिताचे संरक्षण करावे. या प्रश्नावर सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी उमेश कारजोळ यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या