प्रतिष्ठा न्यूज दिपक शिंत्रे
विजयपूर : ज्येष्ठ पत्रकार परशुराम शिवशरण यांच्या घरी जाऊन धमकी देणाऱ्या कथित तांदूळ चोरांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कर्नाटक पत्रकार संघ (कानिप) जिल्हा घटक, आम आदमी पक्ष आणि अखंड कर्नाटक शेतकरी संघाच्या नेतृत्वाखाली विजयपूर जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कानिप संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक यडहळ्ळी म्हणाले की, पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. मात्र, विजयपूरमध्ये या चौथ्या स्तंभाला कमकुवत करणारे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारांना निर्भीडपणे काम करता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणे अत्यंत चिंताजनक आहे.
ज्येष्ठ पत्रकार परशुराम शिवशरण यांनी तांदूळ चोरीबाबत केलेले वृत्त चुकीचे असल्यास संबंधितांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करावी. त्याला आम्ही सामोरे जाऊन कायदेशीर लढा देऊ. मात्र, पत्रकाराच्या घरी जाऊन धमकी देणे, कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकार परशुराम शिवशरण यांच्या घरी गेलेल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. योग्य कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोक यडहळ्ळी यांनी दिला.
कानिपचे जिल्हा सरचिटणीस इंदुशेखर मणूर म्हणाले की, पत्रकार परशुराम शिवशरण यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरी जाऊन त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोकळे सोडू नये. पत्रकार समाजाचा आणि जनतेचा आवाज म्हणून काम करतात. समाजातील अन्याय व बेकायदेशीर कारवायांची माहिती सरकारपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकारने प्रभावी कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
अखंड कर्नाटक शेतकरी संघाचे सरचिटणीस अरविंद कुलकर्णी म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रवृत्ती दूर करून सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी तसेच संविधानाच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी पत्रकार कार्यरत असतात. अशा पत्रकारांवर दबाव आणणाऱ्या कथित तांदूळ चोरांवर जिल्हा प्रशासन आणि सरकारने कठोर कारवाई करावी. पत्रकार शिवशरण यांच्या घरी जाऊन अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणाऱ्यांना तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या पडद्यामागील व्यक्तींनाही तातडीने अटक करून हद्दपार करावे, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रीय कार्यकारिणी मंडळाचे सदस्य शरणू मसळी म्हणाले की, राज्यभर पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. पत्रकारांना चौथा स्तंभ म्हटले जाते; मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी कोणीही पुढे येत नसल्याची स्थिती आहे. जीव धोक्यात घालून वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सरकारने योग्य सुरक्षा द्यावी. शिवशरण यांच्या घरी जाऊन भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ज्येष्ठ वार्ताहर बसवराज संपळ्ळी म्हणाले की, कथित तांदूळ माफियांनी जीवघेणी धमकी देऊन हल्ल्याचा प्रयत्न केला असून जातिवाचक अपशब्दांचाही वापर केल्याचा आरोप आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून योग्य कारवाई करावी. तांदूळ माफियांना काही अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित सर्व आरोपींवर कारवाई करून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भोगेश सोलापूर आणि पत्रकार परशुराम शिवशरण यांनीही आपले विचार मांडले.
या प्रसंगी कानिपचे जिल्हा संघटन सचिव मोहन कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, जिल्हा सचिव अविनाश बिदरी, विनोद सारवाड यांच्यासह पत्रकार गोपाळ कनिमणी, शिवानंद शिवशरण, गुरुराज गद्दनकेरी, षडाक्षरी कंपण्णनवर, बाबू तडळगी, सुनील भास्कर, मोहन कुलकर्णी, मंजू कलाल, शरणू मरनूर, कल्लू शिवशरण, संजीव कुलकर्णी, व्यंकटेश भैरामडगी, फयाज कलादगी, राजेंद्रसिंग हजेर, चंद्रकांत मावूर, संतोष, सुरेश आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या