प्रतिष्ठा न्यूज | अनिल शिंदे
सावळज, दि. ३ : तासगाव तालुक्यातील सावळज येथे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी व तोडफोड केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्वेलरी वर्कशॉप, खासगी हॉस्पिटल आणि जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ या ठिकाणी चोरट्यांनी हात साफ करत पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे.
सिद्धेश्वर मंदिर परिसरातील 'श्री सिद्धनाथ गोल्ड अँड सिल्वर' या ज्वेलरी वर्कशॉपमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यानंतर चोरट्यांनी वायमार्गावरील डॉ. संदीप तारळेकर यांच्या 'यश क्लिनिक' मध्ये घुसून रोख रक्कम चोरून नेली. या घटनेची माहिती स्वतः डॉ. तारळेकर यांनी दिली.
यावरच न थांबता चोरट्यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ चे मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शाळेच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. तसेच सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. मात्र, शाळेत चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सावळज औटपोस्ट व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिन्ही ठिकाणांचा पंचनामा केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत.
सावळजसारख्या गजबजलेल्या गावात एका रात्रीत सलग तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून गावातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या