सांगली : शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय मैदान, विश्रामबाग येथे रविवारी ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील एकूण ९०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यामध्ये ६६४ पुरुष आणि २३६ महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या वैयक्तिक अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये महिला उंच उडी प्रकारात साताऱ्याच्या हर्षदा गडदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर पुरुष गटात कोल्हापूरच्या प्रसाद पेडणेकर यांनी अव्वल स्थान पटकावले. ४०० मीटर अडथळा शर्यतीत पुरुष गटात साताऱ्याचे महादेव बांगर आणि महिला गटात पुणे ग्रामीणच्या पायल संपुडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. हातोडा फेक स्पर्धेत कोल्हापूरच्या विनायक कांबळे यांनी बाजी मारली, तर १० किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत पुणे ग्रामीणचे सुजित तिकोडे यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.
साखळी पद्धतीने होणाऱ्या सांघिक स्पर्धांमध्येही विविध संघांनी दमदार कामगिरी करत आघाडी घेतली. व्हॉलीबॉल पुरुष गटात सांगली संघाने विजय मिळविला, तर महिला गटात कोल्हापूर आणि सातारा संघांनी विजयी सलामी दिली. हॅण्डबॉल पुरुष गटात सांगली व कोल्हापूर संघांनी आपापले सामने जिंकले. खो-खो पुरुष गटात सोलापूर ग्रामीण संघाने आघाडी घेतली, तर महिला गटात सोलापूर शहर आणि पुणे ग्रामीण संघांनी विजय मिळविला. कबड्डी महिला गटात कोल्हापूर संघाने दमदार विजयाची नोंद केली.
दि. २५ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा दररोज सकाळी ६.३० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या स्पर्धांचा आनंद नागरिकांनाही प्रत्यक्ष घेता येणार असून क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या