प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:"आजची पाण्याची बचत म्हणजे उद्याच्या दुष्काळावर मात करण्याची तयारी" या विचारातून तासगाव नगरपरिषदेने शहराच्या जलव्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे.यंदा पावसाचे आगमन आणि पर्जन्यमानाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामांसाठी वापरले जाणारे शुद्ध पिण्याचे पाणी वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत माजी खासदार संजय (काका) पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेकडून पर्यायी पाणी व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.शहरातील शासकीय सार्वजनिक स्वच्छतागृहे,रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी आजपर्यंत पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात होता. मात्र,भविष्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून या पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.नगरपरिषदेकडून शिवनेरी कॉलनीमधील नगरसेवक संदीप सावंत यांच्या घराजवळील पटवेकर बारव विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.या जुन्या विहिरीतील पाण्याचा उपसा करून ते पाणी आता सार्वजनिक स्वच्छतागृहे व इतर स्वच्छतेच्या कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे दररोज सुमारे ४० हजार लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची बचत होणार असून ते पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध राहणार आहे.जलसंपत्तीचा अधिक प्रभावी आणि शाश्वत वापर करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.संभाव्य दुष्काळ आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही काळाची गरज बनली आहे.तासगाव नगरपरिषदेचा हा उपक्रम केवळ पाणी बचतीपुरता मर्यादित नसून, शहराच्या जलव्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरत आहे.भविष्यातील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.यावेळी
माजी नगराध्यक्ष बाबासाहेब (तात्या) पाटील,नगराध्यक्षा सौ विजयाताई बाबासाहेब पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,गटनेते सतीश लिंबळे,पाणीपुरवठा सभापती रोहिणीताई विनोद धोत्रे,नगरसेवक अनिल कुत्ते,संदीप सावंत,सचिन भाट,भारतीताई अशोक धाबुगडे, अर्चनाताई रमेश शिंदे,संध्याताई संजय लुगडे,संतोष बेले आबा, विशाल शिंदे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या