कसबे डिग्रज, प्रतिनिधी : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न) आणि आरोग्य भारती, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कसबे डिग्रज येथे सकाळी ८ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक योगासने सादर केली. यावेळी आशा सेविका, बचत गट महिला, शालेय विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"मातीशी नातं, हाती नांगर,
स्त्री उभी राहिली ताठ मानेने.
योगसाधने बळ आले अंगी,
कुटुंब वाचले, शेती टिकली मानेने."
या चारोळीद्वारे स्त्रीचे शेतीशी असलेले अतूट नाते, तिचा आत्मविश्वास आणि योगामुळे मिळणारे शारीरिक व मानसिक बळ अधोरेखित करण्यात आले. निरोगी स्त्री ही कुटुंब आणि शेतीचा भक्कम आधारस्तंभ असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्मिता भोकारे तसेच योग फाउंडेशनचे सदस्य भाटे सर व त्यांच्या टीमने उपस्थित राहून योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी सामूहिक योगासने करून निरोगी भारताचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल, कसबे डिग्रज यांनी सहकार्य केले. शाळेचे क्रीडा शिक्षक भैरवनाथ तानाजीराव पाटील, प्राचार्य अशोक शिंदे सर, मुख्याध्यापक तसेच विभागीय अधिकारी आणि पर्यवेक्षक एस. डी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी किशोर चंदुरे आणि प्राध्यापिका सारीका पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी ऋतुजा होवाळे, नम्रता ओमसे, वैष्णवी कंकणवाडी, सानिका सपाटे, श्रुती सोनवणे, दीक्षा डोंबे, ईश्वरी तावशी आणि तेजस्विनी शिरूर यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदविला.
योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी नियमित योगाभ्यास करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याची प्रतिज्ञा घेतली. आशा सेविका, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या