प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कारखान्याकडून टेंडर दरापेक्षा स्वस्त दरात साखर पुरवण्याचे आमिष दाखवून आणि बनावट ई-वे बिले व जीएसटी बिलांचा वापर करून एका व्यापाऱ्याची ९ कोटी १६ लाख २५ हजार ९९ रुपयांची महाप्रचंड आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आशिष आनंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तासगाव तालुक्यातील दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे (दोघे रा. बिरणवाडी), अक्षय अनिल पाटील (रा. वायफळे), पलूस तालुक्यातील अभिजीत हनुमंत माने (रा. धनगाव) या चौघांसह सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील राजीव मोरे हे सांगली जिल्हा एन एस यू आय चे माजी अध्यक्ष असून ते माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे समर्थक मानले जातात. पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,विट्यामध्ये आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची भागीदारीत 'अन्नपूर्णा ट्रेडिंग' नावाची कंपनी असून,त्यांनी डिसेंबर २०२१ पासून साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्ण रत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मड्रीम ॲग्रो सोल्युशन्स प्रा.लि.या कंपन्यांशी व्यवहार केले होते. दरम्यानच्या काळात संशयित आरोपी दीपक मोरे,राजीव मोरे आणि अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा कमी आणि स्वस्त दरात साखर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.या मोठ्या आमिषाला बळी पडून आशिष पाटील यांनी वेळोवेळी बँक खात्याद्वारे मोठी रक्कम या तिघांच्या बँक खात्यावर जमा केली. मात्र,पैसे घेऊनही संशयितांनी साखर पुरवठा केला नाही.उलट त्यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट ई-वे बिले आणि जीएसटी बिले तयार केली.प्रत्यक्षात कोणताही साखरेचा पुरवठा न करता केवळ कागदोपत्री साखर पुरवल्याचे भासवून आशिष पाटील यांची मोठी आर्थिक फसवणूक केली.त्यानंतर फसवणुकीची ही रक्कम परत करण्याबाबत संशयितांनी अनेकदा करारपत्रे व प्रोमिसरी नोट लिहून दिल्या आणि त्या रकमेचे धनादेश (चेक्स) आशिष पाटील यांना दिले. मात्र,हे धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकले असता ते खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाऊन्स झाले. धनादेश बाऊन्स झाल्याबाबत जेव्हा आशिष पाटील यांनी संबंधित संशयितांना जाब विचारला,तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार देत आशिष पाटील यांनाच खोट्या अॅट्रॉसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याची थेट धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे पूर्णपणे लक्षात आल्यानंतर आशिष पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून विटा पोलिसांनी दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे, अक्षय अनिल पाटील, अभिजीत हनुमंत माने आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ५०६ आणि ३४ नुसार बनावट कागदपत्रे तयार करणे,संगनमत करून फसवणूक करणे,विश्वासघात करणे आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित रामदास काळे करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या