प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सावळज येथे गवंडी कामासाठी आलेल्या एका मजुराला अत्यंत विषारी मण्यार सापाने दंश केल्यानंतर मृत्यूशी झुंज द्यावी लागली.मात्र,सावळज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाच्या विलक्षण तत्परतेमुळे या मजुराला वेळेत उपचार मिळून त्याचे प्राण वाचले आहेत. "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती," याची प्रचिती या घटनेतून आली असून परिसरातून वैद्यकीय पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.सांगली येथील रहिवासी प्रथमेश गजानन एडके हे सावळज येथे गवंडी कामासाठी आले होते.
बुधवारी रात्री काम सुरू असताना विटा उचलताना अचानक एका मण्यार सापाने त्यांना दंश केला. मण्यार हा अत्यंत विषारी साप असल्याने त्याच्या दंशाची लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत.त्यामुळे प्रथमेश यांनी सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.मात्र,रात्री सुमारे अकराच्या सुमारास त्यांना अचानक तीव्र चक्कर येऊ लागली आणि विष शरीरात भिनत असल्याची जाणीव झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.रुग्णाची गंभीर अवस्था पाहताच वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश महांगरे आणि आरोग्य सेविका प्रियांका चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णावर तातडीने प्रथमोपचार सुरू केले. मात्र,प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमेश यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवणे आवश्यक होते.
रुग्णवाहिकेतूनच सुरू राहिले उपचार..
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालक योगेश काटे यांनी विलक्षण तत्परता दाखवत रुग्णवाहिका तातडीने मिरजच्या दिशेने रवाना केली. विशेष म्हणजे, रुग्णाची प्रकृती वाटेत अधिक बिघडू नये म्हणून डॉ. निलेश महांगरे आणि आरोग्य सेविका प्रियांका चव्हाण हे स्वतः मिरजपर्यंत रुग्णवाहिकेत सोबत राहिले. चालत्या रुग्णवाहिकेतही त्यांनी रुग्णावर सातत्याने उपचार सुरू ठेवले.वैद्यकीय पथकाच्या या धडपडीमुळे प्रथमेश एडके यांना वेळेत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यश आले.वेळेवर मिळालेल्या अचूक उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,आरोग्य सेविका आणि रुग्णवाहिका चालक यांनी दाखवलेली संवेदनशीलता, कर्तव्यदक्षता आणि माणुसकीची भावना यामुळे सावळज परिसरातून या 'वैद्यकीय देवदूतां'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या