प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
कडेपूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या “Yoga for Healthy Ageing – निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संग्राम तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिक व सामूहिक सादरीकरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी व सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या