मिरज, दि.२१: भारतातील ऋषी-मुनींनी तीन चार हजार वर्षांपूर्वी भारतात योग रुजवला.योगगुरु पतंजली यांनी ग्रंथ लिहून योगाचे महत्त्व पटवून दिले. मनुष्याला उत्तम दीर्घायुरारोग्य बहाल करणाऱ्या योगाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून १९० देशामध्ये योगाचा प्रसार व प्रचार करुन जागतिक मान्यता मिळवून दिली. त्यामुळे जागतिक योग दिन जगभर उत्साहात साजरे होऊ लागला. असे प्रतिपादन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. आज उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि आरोग्यजागृतीच्या संदेशासह जीपीएमटी संकुलात योगाची प्रात्यक्षिके करुन हा योग दिन साजरा करण्यात आला. योगविशारद प्रा. प्रिती जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग प्रात्यक्षिके करवून घेतली. त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन पृथ्वीराज व विजया पृथ्वीराज पाटील यांनी केला आणि त्यांचे कौतुक केले.
जीपीएमटी अंतर्गत कार्यरत सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच विविध विभागांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या योग दिन कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी तथा आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कु. इशिता संभाजीराव पाटील हिने उपस्थितांना योगासने करून दाखविली .
पृथ्वीराजबाबा पुढे म्हणाले, “योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. निरोगी, सुदृढ आणि सकारात्मक जीवनासाठी प्रत्येकाने दररोज नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा.”यावेळी त्यांनी योगदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून योगाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले.
सामूहिक योगाभ्यास, निरोगी जीवनाचा संकल्प आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छांसह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या