सांगली, प्रतिनिधी : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधील दागिने चोरी करणाऱ्या एका सराईत महिला चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून तिच्याकडून तब्बल १० लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक संशयित महिला सांगली एस.टी. स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिचे नाव मोनिषा मणिगोंडा (वय २८, रा. जोलार पेठ, बागनूर, ता. वेल्लोर, जि. वेल्लोर, तामिळनाडू) असे असल्याचे निष्पन्न झाले.
तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली. पोलिसी चौकशीत तिने मार्च महिन्यात मिरज बसस्थानक परिसरात प्रवासी बसमध्ये एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे झुमके व अंगठ्या तसेच ५०० रुपयांच्या तीन नोटा असा एकूण १०,२८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेविरुद्ध तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार तसेच एलसीबीच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या