सांगली, दि. 20 जून : सांगली जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या काही कॅफे शॉप्समध्ये अल्पवयीन मुला-मुलींना अश्लील वर्तनासाठी कंपार्टमेंट्स, पार्टी हॉल, डार्क रूम्स, स्मोकिंग झोन तसेच मिनी लॉजिंगसारख्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, काही कॅफे शॉप्समध्ये तासाच्या भाड्याने बंदिस्त खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असून, तेथे अनैतिक प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी तपासादरम्यान प्लायवूड व पडद्यांचे कंपार्टमेंट, कंडोमची पाकिटे तसेच गर्भनिरोधक गोळ्या आढळून आल्याचा दावा संस्थेने केला आहे.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चोगुले यांनी सांगितले की, 17 जून रोजी अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची घटना समोर आल्यानंतर अशा कॅफे शॉप्सविरोधातील कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. संस्थेने गेल्या चार वर्षांपासून या प्रकारच्या कॅफे शॉप्सविरोधात पाठपुरावा सुरू ठेवला असून, 2024 मध्येही आंदोलन करण्यात आले होते.
निवेदनात सांगली शहर व विश्रामबाग परिसरातील अनेक कॅफे शॉप्सची पुन्हा तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या कॅफेमध्ये गुन्हे घडले असतील, त्या ठिकाणच्या चालक व मालकांवर कठोर कारवाई करून त्यांना संबंधित गुन्ह्यांमध्ये सहआरोपी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याचबरोबर काही पोलिस कर्मचारी कॅफे चालकांशी संबंधित असून त्यांच्याकडून हप्ते घेत असावेत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासून चौकशी करावी व दोषी आढळल्यास तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांची सत्यता तपासणे व निष्पक्ष चौकशी करणे हे पोलिस प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार असून, या प्रकरणाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या