प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 16, : आगामी 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमिवर "नशामुक्त भारत अभियान : विकसित भारताची ओळख" या मध्यवर्ती संकल्पनेवर जिल्हा आणि तालुका पातळीवर दि. १७ ते २६ जून २०२६ या कालावधीत विशेष जनजागृती मोहीम आयोजित केली असल्याची माहिती जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी संदीप कोटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या वतीने संपूर्ण देशात "नशामुक्त भारत अभियान : विकसित भारताची ओळख" या मध्यवर्ती संकल्पनेवर (Theme) आधारित विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. या १० दिवसांच्या कालावधीत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, ग्रामपंचायती, नगरपरिषद, तसेच शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ऑनलाईन व्यसनमुक्ती शपथ, जनजागृतीपर चित्रपट / लघुपट, प्रश्नमंजुषा, पोस्टर, घोषवाक्य, निबंध स्पर्धा, नशामुक्ती मित्र नोंदणी मोहीम असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
एक सशक्त, समृद्ध आणि विकसित भारत' घडवण्यासाठी देशातील युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकते, जेव्हा आपला देश आणि येथील तरुण पिढी निरोगी आणि नशामुक्त असेल. व्यसनाधीनता केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला उद्ध्वस्त करते. त्यामुळे या राष्ट्रव्यापी मोहिमेत सांगली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने, सामाजिक संस्थेने आणि तरुण मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा," असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या