सांगली: योग शिक्षण, योग शिबिरे, योग शिक्षकांसाठीचे संघटनात्मक कार्य, योगासने स्पोर्ट्स, योग जजिंग, योगा अवॉर्ड्स, राष्ट्रीय स्पर्धांमधील योगदान, तसेच नेचरोपॅथी व आयुर्वेद या विविध माध्यमांतून योगाचा प्रचार व प्रसार करणारे आंतरराष्ट्रीय योगपटू व योग शिक्षक श्री मोहन कवठेकर यांना ‘ओनररी डॉक्टरेट’ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ग्लोकल युनिव्हर्सिटी आणि योगासन स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया यांच्या वतीने त्यांच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
श्री मोहन कवठेकर हे सध्या सांगली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते राज्य पंच असून राजमती योगा पार्क, विश्रामबाग, सांगली येथील संचालक म्हणूनही कार्य पाहत आहेत.
योग क्षेत्रात अनेक वर्षे सातत्याने कार्य करत असताना त्यांनी विविध स्तरांवर योग शिक्षण, प्रशिक्षण, स्पर्धा व्यवस्थापन आणि मार्गदर्शन यामधून उल्लेखनीय ठसा उमटविला आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर योगासन स्पोर्ट्सच्या उभारणीत आणि संघटनात्मक बांधणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
‘ओनररी डॉक्टरेट’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील योग क्षेत्रातील विविध खेळाडू, योग शिक्षक, योगप्रेमी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून श्री मोहन कवठेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, संपूर्ण योग क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या