मिरज : क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना आणि सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने “मानसिक ताणतणाव आणि त्याचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत मानसतज्ज्ञ डॉ. संज्योत देशपांडे यांनी उपस्थितांना मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि ताणतणाव व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शरीर आणि मन यांचे संतुलन राखणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, दैनंदिन जीवनातील ताणतणावाचा मन व शरीरावर होणारा परिणाम स्पष्ट केला.
ताणतणाव टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे असून, स्वतःवर प्रेम करणे, आपल्या गरजांना प्राधान्य देणे आणि भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. जीवनशैलीत छोटे बदल करून ताण कमी करता येतो, यासाठी वेळेवर पाणी पिणे, नियमित व्यायाम, दीर्घ श्वसन, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे, ध्यान व योगाचा सराव, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणे आणि आवडत्या छंदांना वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेमुळे उपस्थितांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, ताणतणावावर प्रभावीपणे मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
यावेळी मानसतज्ज्ञ अनुश्री ठकार, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कलावतीताई पवार, कॉ. परशुराम कुंडले, सोनू गवळी तसेच सेवा सदन फाउंडेशनच्या मीनाक्षी कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन किरण कांबळे, रुपाली कांबळे, पूजा पागद, वनिता रास्ते, शीतल तांदळे, आक्काताई वंजारी, मीना वांडरे, सुजाता कांबळे, शुभांगी गाडे, सविता कोळी, कस्तुरी कोळी, संगीता जाधव, मनीषा कोलप आणि लीला बिरनगे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या