प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिकतेचा नवा टप्पा गाठत ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक स्मार्ट बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. २४ मार्च रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच सुमारे ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसांचा समावेश होणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बससेवेला ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींना अभिवादन करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मानही यातून अधोरेखित होत आहे. यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘हिरकणी’ यांसारख्या ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
स्मार्ट बसची वैशिष्ट्ये :
३x२ आसन रचना व सुमारे ४५ प्रवासी क्षमता
सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटन
पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम व इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक
अधिक सुरक्षित, आरामदायी व सुलभ प्रवासाची सुविधा
या बस मुख्यतः शहरांदरम्यानच्या अतिव्यस्त मार्गांवर धावणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास आणि वाहतुकीवरील ताण कमी करण्यास मदत होणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात काही बस नागपूर येथे दाखल होऊन नवीन सेवेला सुरुवात होणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या