गॅससाठी धावपळ नको;तासगावात पुरेसा साठा,तासगाव तहसीलदारांचा नागरिकांना दिलासा
By -
मार्च १३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मध्यपूर्व आशियात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यात गॅस पुरवठ्याबाबत प्रशासन सतर्क झाले असून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
तहसीलदार पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध गॅस एजन्सी व गॅस गोडाऊनची पाहणी केली.यावेळी वितरकांकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.त्यामुळे नागरिकांनी घाबरून गॅसचा साठा करू नये किंवा पेट्रोलपंप व गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये,असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.गॅस कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. त्यानुसार एकदा सिलेंडर घेतल्यानंतर शहरी भागात २५ दिवसांनी तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनीच पुढील सिलेंडर बुक करता येणार आहे.तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच बुकिंग करणे आवश्यक आहे.दरम्यान, घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार तालुक्यात धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे. हॉटेल किंवा औद्योगिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर आढळल्यास सिलेंडर जप्त करून संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.घरगुती गॅसचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करावा.अन्यत्र अवैध वापर आढळल्यास नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालय किंवा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.तसेच 18002333555 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रियांका माळी व पुरवठा लिपिक विकास मदने यांच्याशीही नागरिकांनी संपर्क साधावा,असेही तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या