३ महिने पाठपुरावा करूनही ‘एस्.टी.’ चे ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद
By -
मार्च १३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
सांगली : प्रवाशांना माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले आगार आणि बसस्थानकांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद किंवा त्यावरून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या या गंभीर समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 13 मार्च 2026 या दिवशी सांगली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या प्रसंगी ‘सुराज्य अभियाना’चे सांगली जिल्हा समन्वयक राहुल कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि उद्योजक श्री. दिगंबर कोरे उपस्थित होते.
अशीच पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्यात अकोलासह सातारा, जळगाव, अकोला, सिंधुदुर्ग येथेही घेण्यात आली. या वेळी ‘सुराज्य अभियाना’ने ‘एस्.टी.’ प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणला. या बाबत आज महाराष्ट्र राज्यातील विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. सांगली येथे विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून माननीय परिवहन मंत्री आणि अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ श्री. प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा तक्रार वजा निवेदन देऊन तातडीने प्रवाशांची अडचण सोडवण्याची मागणी करण्यात आली.
एवढा पाठपुरावा करून ही प्रवाशांच्या अडचणी बाबत प्रशासन उदासीन का ?
राज्य परिवहन मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले बहुतांश अधिकृत संपर्क क्रमांक वारंवार बंद असतात किंवा संपर्क केल्यास प्रतिसाद मिळाले नाही. ‘सुराज्य अभियाना’ने याविषयी प्रत्यक्ष तपासणी करून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र एवढा पाठपुरावा करूनही आगार / स्थानकस्तरावर परिस्थिती जैसे थे आहे.
1. दिनांक 16.12.2025 रोजी माननीय परिवहन मंत्री, अध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्त यांना ईमेल ने पहिले पत्र दिले.
2. त्यावर दिनांक 17.12.2025 रोजी महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी 31 विभाग नियंत्रकांना ईमेलद्वारे आदेश दिले.
3. डिसेंबर 2025 मध्ये राज्यातील विविध बस स्थानक / आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक यांना या विषयी प्रत्यक्ष निवेदन दिले.
4. दिनांक 20.02.2026 रोजी सुराज्य अभियानाने स्मरणपत्रे ईमेल केल, तसेच केलेली कार्यवाही खात्यास आणि अर्जदारास कळविण्यात यावी, असे सांगितले.
संपर्क क्रमांक तपासणीचा धक्कादायक आकडेवारी !
‘सुराज्य अभियाना’च्या प्रत्यक्ष पडताळणीतून समोर आलेली आकडेवारी प्रवाशांच्या चिंतेत भर टाकणारी आहे !
बस स्थानक + आगार असे एकूण तपासलेली संपर्क क्रमांक संख्या : 413
सुरू असलेले / प्रतिसाद मिळाला अशी क्रमांक संख्या : 117 (केवळ 28%)
बंद / प्रतिसाद न मिळणारी क्रमांक संख्या : 296 (72%)
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानां’तर्गत केवळ रंगरंगोटी करून किंवा पारितोषिके देऊन चालणार नाही, तर प्रवाशांना मिळणारी ‘प्रत्यक्ष सेवा’ अधिक महत्त्वाची आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही या अडचणी विषयी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र प्रशासकीय अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रवाशांची गैरसोय आजही जैसे थे ! मुळात, बसस्थानकाच्या दूरध्वनी व संपर्क यंत्रणेसाठी दरमहा ठराविक निधी (बजेट) मंजूर असतो, मग हा पैसा जातो कुठे? जर प्रवाशांना ही सुविधाच मिळत नसेल, तर या संदर्भातील वर्षानुवर्षे दिलेली रक्कम संबंधित जबाबदार अधिकार्यांकडून व्याजसहित का वसूल केला जाऊ नये? असा थेट प्रश्न ‘सुराज्य अभियाना’चे सांगली जिल्हा समन्वयक राहुल कदम यांनी उपस्थित केला आहे.
त्वरित प्रशासकीय जबाबदारी निश्चित करा !
बंद लँडलाईनला सक्षम पर्याय म्हणून प्रत्येक बस स्थानक आणि डेपोसाठी अधिकृत भ्रमणभाष क्रमांक त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. त्यांची माहिती त्वरित संकेतस्थळावर अध्ययावत करण्यात यावी. तसेच, जाणीवपूर्वक फोन न उचलणार्या किंवा अधिकृत क्रमांक निष्क्रिय ठेवणार्या जबाबदार कर्मचारी आणि अधिकार्यांवर असे करणे ही ‘सेवा-त्रुटी’ मानून कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. याशिवाय, बस स्थानकाचे दर १५ दिवसांनी होणार्या ‘डीप क्लीनिंग इन्स्पेक्शन’ मध्ये केवळ स्वच्छतेचीच नाही, तर ‘संपर्क प्रणाली’च्या स्थितीची तपासणी करणे अनिवार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. या विषयाची गंभीरता लक्षात घेता, विभाग नियंत्रकांच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांकडे हे तक्रार वजा निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या