प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर सांगलीच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला असून, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार आणि टोलेबाज शब्दांत हल्लाबोल केला आहे.“आगीशी खेळ खेळू नका,” असा थेट इशारा देत संजयकाका पाटील म्हणाले, “तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे.तो बाहेर काढायला लागलो तर २० ते २५ पत्रकार परिषदाही कमी पडतील.”जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर केलेल्या वक्तव्यांवर टीका करताना त्यांनी त्यांना “विश्वासघातकी राजकारण करणारे” असे संबोधले. “मी तुम्हाला कधी नेता मानलं नाही.बालिश वक्तव्य करून राजकारण करू नका,” असा थेट टोला त्यांनी लगावला.यावेळी त्यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, “भाजपमध्ये प्रवेशासाठी तुम्ही किती उंबरठे झिजवले, कोणकोणत्या साटेलोट्या केल्या,याचा मी साक्षीदार आहे. ते बाहेर काढायला लावू नका.”दरम्यान,स्वतःच्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, “मी संघर्षातून पुढे आलो आहे.लोकसभा आणि विधानसभा पराभव झाले,तरी पुनर्वसनासाठी मी कुणाचे उंबरठे झिजवले नाहीत.”तसेच, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी घडलेल्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “आम्ही अध्यक्षपदासाठी मागणी केली होती, मात्र नंतरच्या घडामोडी पाहता विश्वासघातकी लोकांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”या सर्व वक्तव्यांमुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून,आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या