प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सर्कसिंह परशुराम माळी सभागृहात पार पडली; मात्र ही सभा केवळ दोन मिनिटांत आटोपल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर १ ते २५ विषय मंजूर करत सभा घाईगडबडीत संपवली, असा गंभीर आरोप विरोधी गटाकडून करण्यात आला आहे.सभेच्या सुरुवातीला विषय क्रमांक एक वाचण्यात आला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कोणतीही सविस्तर चर्चा न करता सर्व विषय थेट मतदानाला टाकले आणि बहुमताच्या आधारे मंजूर करत काही क्षणांतच सभा संपवली.
यामुळे संतप्त झालेल्या विरोधी गटाच्या नगरसेवकांनी “महत्त्वाचे विषय असताना चर्चा टाळली जात आहे,” असा आरोप करत निषेध व्यक्त केला. “प्रत्येक विषयावर सखोल चर्चा झाली पाहिजे होती, मात्र आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही,” असे त्यांनी सांगितले.
सभा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये धडक दिली. त्यांनी केबिनमध्येच जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी “बहुमताच्या जोरावर सभा गुंडाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.गटनेत्या सुशीला जाधव यांनी आरोप केला की,“सत्ताधारी बहुमताचा गैरवापर करून विरोधी नगरसेवकांची मुस्कटदाबी करत आहेत.”
तसेच नगरसेवक अरुण साळुंखे आणि अभिषेक देशिंगकर यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “स्वर्गीय आर. आर. आबांच्या फोटोचा वापर करून सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत.”दरम्यान, विविध प्रभागांतील समस्यांचा पाढा नगरसेवक सचिन कांबळे, रामभाऊ माळी, पूनम माळी, शोभा जाधव, अफजल मुजावर, अमृता माळी, तुकाराम कुंभार, ज्योतीताई कोळी आणि उषाताई कांबळे यांनी मांडत जोरदार हल्लाबोल केला.विरोधी नगरसेवकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “सभागृहात आम्हाला बोलू दिले नाही, तर आगामी काळात अशाच आक्रमक पद्धतीने उत्तर दिले जाईल.”या घटनेमुळे तासगाव नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, शहराच्या राजकारणात पुढील काळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या