प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:20 मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ निमित्त तासगाव येथील मंगलमूर्ती सेवाभावी संस्था गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे चिमणी व इतर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे.
यंदाही या उपक्रमांतर्गत दि. 13 मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत संस्थेच्या सदस्यांनी एकूण 50 घरटी तयार केली. ही घरटी पुढील वर्षभर पक्षीप्रेमींच्या घरी मोफत बसवली जाणार आहेत.जागतिक चिमणी दिनाच्या औचित्याने आरवडे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना चिमण्यांचे महत्त्व आणि संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरात कृत्रिम घरटी बसवून यंदाच्या चिमणी संवर्धन उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमासाठी पर्यावरणप्रेमी शिक्षक महादेव जंगम सर आणि आरवडे येथील संदीप चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की, वाढते काँक्रिटीकरण, वृक्षतोड आणि शेतीत वापरली जाणारी रसायने यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. एकेकाळी घराघरात ऐकू येणारा चिवचिवाट आता दुर्मिळ होत चालला असून पर्यावरणाचा समतोलही बिघडत आहे.
चीनमध्ये काही वर्षांपूर्वी चिमण्यांचा नाश केल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले होते. त्यानंतर पुन्हा संवर्धन मोहिम राबवावी लागली, हे उदाहरण देत चिमण्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.संस्थेने गेल्या दशकात तासगाव व परिसरात सुमारे 400 कृत्रिम घरटी बसवली असून त्यातून हजारो चिमण्यांचा जन्म झाला आहे. “प्रत्येक घराने चिऊताईसाठी एक कोपरा द्यावा,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
तसेच उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी व आंघोळीची सोय घराच्या परिसरात करावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले.मंगलमूर्ती सेवाभावी संस्था ही कृत्रिम घरटी पूर्णपणे मोफत देत असून, सदस्य स्वतः पक्षीप्रेमींच्या घरी जाऊन घरटी बसवून देतात. संस्थेचा हा उपक्रम तासगाव परिसरात लोकप्रिय ठरत असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.संस्था गेली दहा वर्षे चिमणी संवर्धनासोबतच 21 विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. देशभरातून संस्थेला आर्थिक व इतर स्वरूपात मदत मिळत असल्याची माहितीही देण्यात आली.घरटी मिळविण्यासाठी इच्छुकांनी श्री. निकम (मो. 95 61 93 93 92) यांच्याशी संपर्क साधावा, असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या