मुंबई प्रतिनिधी : राज्यात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली असून, रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सदरा राजीनामा सादर केला आहे.
नाशिकमधील कथित ‘भोंदूबाबा’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर वाढलेल्या राजकीय व सामाजिक दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक येथील अशोक खरात याच्यावर एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर खरात याचे अनेक कथित प्रकार उघडकीस आले असून, राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, चाकणकर आणि खरात यांचे एकत्रित फोटो तसेच त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद अधिकच तीव्र झाला. विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.
याचबरोबर, खरात याच्यासोबत अनेक राजकीय नेते व महत्त्वाच्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फोटोंच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींवरही चौकशीची टांगती तलवार राहणार का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाला गोवले जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी सात ओळींच्या पत्राद्वारे आपला राजीनामा सादर केला. या पत्रात त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, चौकशी प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या राजीनाम्यामुळे ‘भोंदूबाबा’ प्रकरणात हा पहिला मोठा राजकीय फटका मानला जात असून, पुढील काळात आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या