पलूस : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पलूस तालुक्यातील पोलीस मंडळ व रामनगर मंडळ येथे आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार पडले. दोन्ही ठिकाणी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव एकत्र येत राष्ट्रप्रेम, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा जागर घडवून आणला.
संमेलनात संतांच्या मार्गदर्शनातून हिंदू धर्माची परंपरा, कुटुंबव्यवस्था आणि राष्ट्रनिष्ठा यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर जिल्हा सेवा प्रमुख श्री भास्कर पाटील यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली, कुटुंबातील एकोपा, सामाजिक समरसता आणि राष्ट्राभिमान यावर सखोल मार्गदर्शन करत प्रत्येक हिंदू कुटुंब हे संस्कारांचे केंद्र बनावे, असे आवाहन केले.
मातृशक्तीच्या वतीने राष्ट्र सेवा समितीच्या कार्यकर्त्या सौ. हर्षदा बेडेकर यांनी सक्षम कुटुंब पद्धती, हिंदू संस्कार आणि भावी पिढी घडविण्यात मातृशक्तीची भूमिका यावर प्रभावी विचार मांडले. त्यांनी “संस्कारयुक्त कुटुंब हीच राष्ट्रनिर्मितीची खरी पायाभरणी आहे,” असा संदेश दिला.
यावेळी इस्कॉन मंदिराचे संत केशव प्रभू तसेच औदुंबर येथील ह.भ.प. वासुदेव बुवा जोशी यांनी हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, आचरण आणि भगवद्गीतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन करत धर्म, कर्तव्य आणि राष्ट्रसेवा यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला.
कार्यक्रमास मा. संघ चालक श्री चंद्रकांत फाळके, कार्यवाह श्री विजय सूर्यवंशी तसेच ऍडव्होकेट सौ. सारिका पाटील ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संमेलनास पंचक्रोशीतील व्यापारी मंडळी, व्यवसायिक, उद्योजक, विविध सामाजिक व हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते व विविध व्यापारी संघटनांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या संमेलनाचे आयोजन श्रीकांत जोशी, रवींद्र दांडेकर, उमेश माने, सागर माने, विपुल शिंदे तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्र, खंडोबा मंदिर, महादेव मंदिर येथील सेवेकरी आणि मातृशक्ती यांच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय” तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुष व शूरवीरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. त्यानंतर पसायदान पठण करण्यात आले व महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या भव्य संमेलनामुळे पलूस तालुक्यात हिंदू समाजात एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि संस्कारांचा दृढ पाया अधिक मजबूत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या