तासगाव : तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील विठ्ठलराव पागे विद्यामंदिर या हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना भर उन्हात बसवून चिमुरड्या विद्यार्थ्यांना तब्बल तास ते दीड तास उन्हात बसवण्यात आले, तर दुसरीकडे शिक्षक मंडळी सावलीत बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप करत पालक विजय विठ्ठल पाटील यांनी संस्थेकडे लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीत त्यांनी शाळेच्या एकूणच शैक्षणिक आणि प्रशासकीय ढासळलेल्या कारभारावर गंभीर बोट ठेवले आहे. चिंचणी शेजारील बोरगाव येथील २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असताना, चिंचणी हायस्कूलचा एकही विद्यार्थी यादीत नसल्याची बाब त्यांनी नमूद केली आहे. शाळेत अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, शेवटचे धडे शिकवले जात
नाहीत, तसेच उजळणीही घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शिक्षण खाजगी क्लासवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच सध्या इयत्ता दहावी विज्ञान आणि आठवी इंग्रजी विषयांसाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती निष्क्रिय असून, स्पष्टपणे प्रश्न मांडणारे पालक नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेने नेमलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना तासिका देण्याचाही प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडेही पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब असून, शाळेतील क्रीडा साहित्याचा अभाव, झाडांची निगा न राखणे, तसेच व्यायामशाळेचे अपूर्ण बांधकाम अशा अनेक समस्या तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, व्यायाम शाळेसाठी गावकऱ्यांकडून वर्गणी गोळा करूनही काम पूर्ण झालेले नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.
शाळेत दर दोन-तीन वर्षांनी गणवेश बदलून तो तासगावमधील एका ठराविक दुकानातूनच घेण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या व्यवहारात शिक्षक कमिशन घेत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आठवडाभर एकाच गणवेशात यावे लागते, त्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शिस्तीचा अभावही प्रकर्षान जाणवत असल्याचे एका घटनेतून स्पष्ट झाले आहे. दहावीच्या निरोप समारंभात काही विद्यार्थ्यांनी गाड्यांच्या पुंगळ्या काढून मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली होती, मात्र याकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारामुळे चिंचणी हायस्कूलमधील शिक्षण व्यवस्था, प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित संस्थेने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या