प्रतिष्ठा न्यूज
नाशिक : अंधश्रद्धा, मंत्र-तंत्र आणि दैवी शक्तींचा दावा करत महिलेला जाळ्यात ओढून “तू माझी प्रेयसी झाली नाहीस तर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा नवरा मरेल अशी भीती दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, आरोपी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून लोकांचे भविष्य सांगत असे. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि काही सेलिब्रिटीही जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने संबंधित महिलेशी ओळख वाढवली.
२०१९ साली कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात झालेल्या भेटीत आरोपीने, “माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करतो. तुझे श्रीमंत घराण्यात लग्न होईल, करिअर घडेल,” असे सांगत तिचा विश्वास निर्माण केला. पुढे विविध धार्मिक विधींच्या नावाखाली तिच्याकडून पैसेही घेतल्याचा आरोप आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये पीडिता कार्यालयात एकटी गेली असता, आरोपीने तिला प्रसाद म्हणून पेढा खायला दिला व तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजले. त्यानंतर तिला गुंगी आल्याचा आरोप आहे. याच अवस्थेचा फायदा घेत वरीलप्रमाणे भीती दाखवत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, पीडितेचा साखरपुडा मोडल्यानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधून ‘पुष्कराज’ खडा देत तो ‘सिद्ध’ असल्याचा दावा केला व ५० हजार रुपये घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. नंतर तिचे लग्न झाल्यानंतरही पतीसोबत आशीर्वाद घेण्यासाठी बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार, फसवणूक, धमकी आणि अंधश्रद्धा पसरवण्यासंबंधी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या