तासगाव : महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिव्यांगांच्या कल्याणासाठी त्यांच्या स्व-उत्पन्नातून ५ टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक असताना,तासगाव नगरपालिकेत मात्र या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.आज स्वराज्य पक्ष आणि प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग बांधवांसह पालिका प्रशासनाची भेट घेऊन दिव्यांग निधी जमा करण्याबाबत विनंती केली.यावेळी पालिका प्रशासनाने यावर्षी कर वसुली कमी झाल्याचे कारण देत पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले.
पालिकेला घरपट्टी,पाणीपट्टी,गाळा भाडे आणि इतर करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असताना, त्यातून ५% निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.तरीही “पालिकेकडे पैसे नाहीत” असा दावा केल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे, मागील वर्षी दिव्यांगांना ५००० रुपयांची मदत देण्यात आली होती. मात्र,यावर्षी ही रक्कम थेट १५०० ते २००० रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.या मोठ्या कपातीमुळे दिव्यांग बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.दिव्यांग बांधवांनी व्यक्त केलेल्या भावना अधिकच तीव्र आहेत. “आमचा वर्षभराचा हॉस्पिटल खर्च, औषधे,तपासण्या,उपचार यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो.ही मिळणारी मदत आधीच अपुरी होती, त्यातही कपात करून आमच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.दिव्यांगांसाठी मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या दैनंदिन उपचार,औषधोपचार,प्रवास खर्च आणि इतर गरजांसाठी अत्यंत महत्त्वाची असते.मात्र,इतक्या कमी रकमेने वर्षभराचा खर्च तर दूरच, एका महिन्याचा हॉस्पिटल खर्चही भागत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली.“आमच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारून आमच्या भावनांशी खेळ केला जात आहे,”असा आरोप करत दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दरम्यान,या प्रकरणी संबंधित आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा काही दिव्यांग बांधवानी दिला असून हा प्रश्न आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.दिव्यांगांच्या हक्काचा निधी खरंच अपुरा आहे की प्रशासनाची उदासीनता? अशी चर्चा आता तासगावात रंगू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या