तासगाव : तासगाव तालुक्यात प्रथमच नागरिकांच्या सेवेसाठी रेस्क्यू टीम,अयोध्या अॅम्बुलन्स आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यरत करण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण सेवांचा शुभारंभ तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तासगाव नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अभिषेक देशिंगकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तालुक्यात वाढत्या अपघात आणि आपत्कालीन घटनांच्या पार्श्वभूमीवर,वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर येत होत्या.हीच गंभीर बाब लक्षात घेऊन तासगावमध्ये ही अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आली आहे.नवीन सुरू करण्यात आलेली अॅम्बुलन्स सेवा व रेस्क्यू टीम ही तालुक्यातील नागरिकांसाठी संजीवनी ठरणार असून, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवून त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य ही टीम करणार आहे.या आपत्कालीन पथकात अजित पाटील,कुणाल भोसले,गणेश कदम,गोविंद तांदळे आणि विशाल पाटील यांची निवड करण्यात आली असून,ही टीम तासगाव तालुक्यात २४ तास सेवा देणार आहे.या उपक्रमामुळे तासगाव तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, अनेकांचे प्राण वाचवण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“मृत्यूशी शर्यत थांबवणार! तासगावात पहिलीच रेस्क्यू टीम मैदानात”
By -
मार्च २३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या