मुंबई प्रतिनिधी : राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मोठं विधान करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला असून या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या Ashok Kharat प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली असताना मुख्यमंत्र्यांनी प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली. “प्रकरण गंभीर आहे. वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू असून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आणि एसआयटी मिळून तपास करत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत कोणालाही वाचवले जाणार नाही. कुणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पुढे यावे. या प्रकरणाला राजकीय रंग देणे चुकीचे आहे. सर्वाधिक पुरावे आमच्याकडे आहेत.”
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कोणकोण या ठिकाणी गेले होते, याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. कुणासोबत फोटो असणे म्हणजे गुन्हा ठरत नाही. मात्र महिलांची फसवणूक करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.” तसेच खरातच्या संस्थेला देण्यात आलेल्या ४० किमी पाणीपुरवठा योजनेचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
“काही जण या प्रकरणाचे राजकारण करत आहेत; मात्र आमचे प्राधान्य पीडित महिलांना न्याय देणे आहे. सामाजिक दबावामुळे अनेक महिला पुढे येत नाहीत. त्यांना धीर देऊन पुढे आणण्याचे काम सुरू आहे,” असेही त्यांनी सांगितले.
सरकारकडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार असून कोणालाही संरक्षण मिळणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या