महाराष्ट्रातील मराठेशाहीच्या इतिहासाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले आहे. आज दि २६ मार्च २०३६ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून “मराठेशाहीचा अभ्यासू इतिहासकार हरपला” अशा भावना व्यक्त होत आहेत.
सांगली जिल्ह्यातील तडसर येथे 30 डिसेंबर 1941 रोजी जन्मलेल्या डॉ. पवार यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ मधून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करत विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून लौकिक मिळवला. त्यांनी एम.ए. विद्यार्थ्यांसाठी सुमारे 20 क्रमिक पुस्तकेही लिहिली.
शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1964 पासून संशोधन क्षेत्रात कार्य सुरू केले. ऐतिहासिक कागदपत्रांच्या सखोल अभ्यासातून त्यांनी मराठा इतिहासावर भक्कम संशोधन उभे केले. महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांच्या नावावर 25 हून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत.
इतिहास परिषदांमध्ये सक्रिय सहभाग, 45 पेक्षा अधिक शोधनिबंध, तसेच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद अशी विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. 1992 मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना करून इतिहास संशोधन आणि समाजप्रबोधनाला चालना दिली.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. तसेच प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन झाले होते.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रातील एक अभ्यासू, संशोधक आणि विचारवंत हरपला आहे. त्यांच्या संशोधनकार्याची आणि लेखनाची परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या