कुंडल प्रतिनिधी : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात वाहतूकदारांशी करार पूर्ण करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, वाहनधारक तसेच ऊसतोड मजुरांच्या मदतीसाठी क्रांती कारखाना नेहमीच पुढाकार घेत आला आहे. तीन वर्षांपूर्वी शासनाने ऊस तोडणी मजुरी दरात 34 टक्के वाढ दिल्यानंतर क्रांती कारखान्याने राज्यात पहिल्यांदाच वाहतूकदारांना 15 टक्के तर तोडणी मजुरांना 35 टक्के वाढ लागू केली होती. तसेच गतवर्षीही वाहतूक दरात 10 टक्के वाढ देण्यात आली. मागील हंगामाप्रमाणे यंदाही लवकर करार करून अॅडव्हान्स देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
टोळी मुकादमांकडे वाहतूकदारांच्या अडकलेल्या रक्कमांसाठी कारखाना प्रशासन मदतीची भूमिका घेईल. त्यामुळे सर्व वाहतूकदारांनी सक्षम मजूर टोळ्या भराव्यात, जेणेकरून येणाऱ्या गळीत हंगामात वेळेत व जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे वाहून आणता येईल. तसेच वाहतूकदारांनी कागदोपत्री प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करूनच मजूर टोळ्यांशी व्यवहार करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात महादेव पवार, किरण गावडे, विकास काळे, अविनाश सूर्यवंशी, विकास पवार, मल्हारी जाधव, विक्रम पवार, अंकुश मदने, विजय यादव, आप्पासो जंगम, मीनानाथ अभंग या वाहतूकदारांच्या कराराची पूर्तता करण्यात आली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक जयप्रकाश साळुंखे, सुकुमार पाटील, विजय पाटील, तात्यासाहेब वडेर, दिलीप थोरबोले, अशोक विभुते यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचालक जितेंद्र पाटील यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या