प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मध्यपूर्वेत इजराइल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना सांगली विधानसभा मतदारसंघातील कुपवाड क्षेत्रातील सुमारे ३० ते ३५ नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. काही क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी तातडीने पुढाकार घेत संबंधित सर्व नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधला. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, निवासस्थानील परिस्थितीची आणि स्थानिक सुरक्षेची सविस्तर माहिती घेतली. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली असून त्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
यासोबतच, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध व्हावी यासाठी दूतावास, परराष्ट्र विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास तत्काळ समन्वय साधून मदत पोहोचविण्याची तयारी प्रशासनाने दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, “सांगली मतदारसंघातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखाच आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या समन्वयातून त्वरित मदत पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे.”
दरम्यान, या घटनेनंतर सांगलीतील संबंधित कुटुंबीयांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते; मात्र आमदारांनी थेट संपर्क साधल्यामुळे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची खात्री दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या