प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील तब्बल ६९ गावांसाठी केवळ एकच पोलीस ठाणे कार्यरत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर सावळज येथे स्वतंत्र पोलीस ठाणे तात्काळ मंजूर करावे,अशी जोरदार मागणी राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,सावळज (ता. तासगाव) येथे पोलीस दुरक्षेत्र असून स्वतंत्र जागाही उपलब्ध आहे.तरीही नवीन पोलीस ठाण्याच्या उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. सावळज दुरक्षेत्राअंतर्गत सुमारे २० गावे येतात.या गावांमध्ये गुन्हा घडल्यास तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना तासगावला जावे लागते, त्यामुळे वेळ व पैशाचा मोठा अपव्यय होतो.राज्य शासनाने २५ ऑगस्ट २०२३ रोजी नवीन पोलीस ठाणे निर्मितीसंदर्भात अध्यादेश काढला आहे.त्या अध्यादेशातील अटी-शर्तींनुसार ग्रामीण भागात १० किमीपेक्षा अधिक अंतरावर पोलीस ठाणे नसावे तसेच वार्षिक गुन्ह्यांची सरासरी १५० पेक्षा जास्त असावी, असे स्पष्ट निकष आहेत.सावळज परिसर या सर्व निकषांमध्ये बसत असूनही प्रस्ताव रखडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तासगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असून वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्ह्यांची निर्गती रखडत आहे. ११२ क्रमांकावर कॉल आल्यानंतर पूर्व भागातील गावांमध्ये पोलिसांना तात्काळ पोहोचणे शक्य होत नाही. परिणामी,नागरिकांना न्याय मिळण्यात विलंब होत आहे.तासगाव पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण कमी करून पूर्व भागातील नागरिकांना जलद व प्रभावी सेवा मिळावी,यासाठी सावळज येथे नवीन पोलीस ठाण्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी ठाम मागणी प्रशांत केदार, पै. सचिन भोसले यांनी केली आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष टिपूभाई पटवेगार,राज्य उपाध्यक्ष पै. सचिन भोसले,नितीन जाधव,अंकुश केंगार,माजी जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी आदींच्या सह्या आहेत.सावळज पोलीस ठाण्याच्या मागणीमुळे आता प्रशासन काय भूमिका घेते,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या