सांगली: नदी प्रदूषण, वारंवार येणारे महापूर आणि त्याचा नागरिक, पशुधन, शेती व जैवविविधतेवर होणारा गंभीर परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने एप्रिल महिन्यात दिनांक ६ ते ९ या कालावधीत‘संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे.
समितीचे अध्यक्ष डॉ. अभिषेक दिवाण यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नदीकाठावरील परिसरात वाढते जलप्रदूषण आणि महापुरांचा धोका ही चिंतेची बाब बनली आहे. नदीत विविध ठिकाणांहून येणारे सांडपाणी, औद्योगिक व रासायनिक स्राव, नगरपालिकांचे व ग्रामपंचायतींचे अशुद्ध पाणी यामुळे नदीचे पाणी दूषित होत असून त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर, शेतीवर आणि पशुधनावर होत आहे.
नदीपात्रातील अनेक भागांत मासे मृतावस्थेत आढळणे, पाण्याचा काळवंडलेला रंग, दुर्गंधी आणि दूषिततेमुळे नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी व इतर वापरासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या परिस्थितीमुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून पर्यावरणीय समतोल बिघडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. डॉ. दिवाण म्हणाले की, २००५ सालापासून महापुराची समस्या अधिक तीव्र झाली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज यांचे योग्य नियोजन न झाल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत पूरस्थिती गंभीर बनत आहे. आतापर्यंत तीन-तीन वेळा आलेल्या मोठ्या पुरामुळे सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी, जनजीवन विस्कळीत होणे आणि पर्यावरणीय नुकसान झाले आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने अधिक ठोस व समन्वित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे समितीने स्पष्ट केले. तसेच अशा आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांनी जागरूक राहणे, प्रशासनाशी संपर्कात राहणे आणि पूरनियोजनात सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
याच उद्देशाने नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी आणि महापूर व जलप्रदूषणाविरोधात लोकजागृती घडवण्यासाठी एप्रिल महिन्यात ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीस प्रशांत केंगार, प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, संजय कोरे, सचिन सगरे, आशीष कोरे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या