प्रतिष्ठा
न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सांगली जिल्हा परिषदेमधील शासकीय जाहिरातीत पदावर नसलेल्या व्यक्तीचे नाव छापल्याच्या आरोपावरून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन देत २० एप्रिलपासून विभागीय आयुक्त, पुणे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर “जि.प. शाळेत पट वाढवा” या मोहिमेअंतर्गत सांगली जिल्हा परिषदेकडून १९ मार्च २०२६ रोजी विविध दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या जाहिरातीत नूतन जि.प. उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांचे नाव व पद छापण्यात आले. प्रत्यक्षात लाड यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभार २४ मार्च २०२६ रोजी स्वीकारला होता. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होताना ते पदावर नसतानाही त्यांचे नाव व पद छापणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.ही जाहिरात प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली असून ती मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या आदेशानेच प्रसिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशांत केदार यांनी आपल्या निवेदनात अधिक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, अधिकारी पदाचा वापर केवळ प्रसिद्धीसाठी केला जात आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूनेच अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तसेच, संबंधित जाहिरातीवर झालेला खर्च हा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून भरावा,अशीही मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीची राज्यस्तरीय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, तसेच भविष्यातील पदोन्नतीही रोखावी, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.या निवेदनावर प्रशांत केदार यांच्यासह नितीन जाधव, प्रमिला गावडे, युनूस कोल्हापूरे, विजया माळी, अजित कांबळे, अक्षय दोडमणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान,या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या