प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : कृष्णा नदीतील वाढते प्रदूषण, सांडपाणी समस्या, जलस्रोतांवरील वाढता ताण आणि महापुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर “चला जाणूया नदीला” या महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रमांतर्गत तसेच कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली यांच्या वतीने दि. ६ ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘कृष्णा नदी संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेच्या माध्यमातून कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन नदीप्रदूषणाचे दुष्परिणाम, जलसंवर्धनाची गरज, जैवविविधतेचे रक्षण, सांडपाणी व्यवस्थापन आणि महापूर नियंत्रण या विषयांवर नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक द्रव्ये तसेच नगरपालिका आणि ग्रामपंचायतींचे अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात मिसळल्यामुळे मानवी आरोग्य, शेती, पशुधन आणि जलचर जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची जाणीव या यात्रेद्वारे समाजात निर्माण केली जाणार आहे.
या यात्रेचा शुभारंभ दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता तांबवे येथून होणार असून, तांबवे ते राजापूर बंधारा या मार्गावर विविध गावांतून ही यात्रा चार दिवस मार्गक्रमण करणार आहे. यात्रेदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
यात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे :
दि. ६ एप्रिल
तांबवे, कोळे, नरसिंहपूर, बहे, खेराडेवाडी, बिचूद, बोरगाव, ताकारी, तुपारी, दुडोंडी
दि. ७ एप्रिल
पुंडी, वाळवा, नागराळे, नागठाणे, राडेवाडी, बुरली, अंजनापूर, अंकलखोप, औदुंबर, तावदरवाडी, भिलवडी
दि. ८ एप्रिल
माळवाडी, सुखवाडी, ब्रम्हनाळ, डिग्रज, नावरसवाडी, पद्माळे, सांगली, हरिपूर
दि. ९ एप्रिल
हरिपूर, अंकली, इनाम धामणी, निलजी, बामणी, ढवळी, विजयनगर, मिरज, वड्डी, म्हैशाळ, राजापूर
या यात्रेची सांगता सभा दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता राजापूर येथे होणार आहे.
“नदी ही फक्त पाण्याची वाहिनी नसून जीवनाची शाश्वत रेषा आहे,” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश असून, नागरिकांनी या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली यांचे अध्यक्ष डॉ. अभिषेक विजयकुमार दिवाण यांनी केले आहे.
नदीला जाणूया हा उपक्रम चांगला आहे परंतु हा तेवढ्या पुरता स्टंट नसला पाहिजे. काही तरी फर्म किंवा ठाम, कायमस्वरूपी उपाय यातून निघाला पाहिजे. कारण कृष्णा नदी प्रदूषण ही आजची समस्या नाही. गेली कित्येक वर्षे ही नदी प्रदूषित होत आहे. कृष्णा नदी आणि शेरी नाला तसेच कृष्णा नदी आणि कारखान्यांचे सांडपाणी यांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे सख्य आहे. नदीपात्रात सांडपाणी सोडल्या मुळे नदी तील मासे मरणे ही कायमची समस्या आहे आणि प्रदूषित पाण्यामुळे काविळीची साथ ही सांगली करांच्या पाचवीला पुजलेली गोष्ट आहे. आणि या सगळ्या मध्ये राजकारण आणि राजकारणी आहेत. महापालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळ अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे. मागच्याच महिन्यात नदीपात्रात कारखान्याचे सांडपाणी मिसळल्यामुळे नदीतील मासे मेले होते. असे मासे लोकांच्या खाण्यात आले तर विषबाधा होऊ शकते. थोडक्यात हे राजकारण लोकांच्या जिवाशी खेळत आहे. त्यावेळी एकदमच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे झाले आणि एक मोठी गर्जना करुन पुन्हा झोपी गेले असे वाटते. महापुराबद्दल पण हीच परिस्थिती आहे. नेमेची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे नेमेची येतो मग महापूर आणि मग मालमत्तेचे नुकसान, मंत्री, पुढाऱ्यांचे पुराच्या पाण्यात सुरक्षित उभे राहून फोटो सेशन आणि सदैव पूर ग्रस्तासोबत म्हणून लावलेले फ्लेक्स असे लिहून सदैव तुम्ही पूरग्रस्तच राहा असा दिलेला संदेश म्हणूया फार तर. महापुराची कारणे शोधून त्यावर उपाय काढला पाहिजे नाही तर इकडच्या पुढाऱ्यांनी अलमट्टी कडे बोट दाखवायचे आणि तिकडच्यानी काखा वर करायच्या असे गेली अनेक वर्षे चालू आहे पण ज्याप्रमाणे मंदीत संधी शोधायची असते तशीच महापुरात संधी राजकारणामुळे शोधली जात नाही. मी या पूर्वी पण म्हटले होते की महापुराचे वाहून जाणारे काही टीएमसी पाणी कृष्णा नदी वरील लिफ्ट इरिगेशन योजना चालू करुन हे जादा पाणी सातारा, सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी सोडून तेथील लहान मोठे बांध बंधारे भरुन घेतले तर तेथील लोकांना पावसाळ्यात पीक घेता येईल आणि तेथील दुष्काळ हटण्यास मदत होईल आणि इकडे पूरनियंत्रण होण्यास मदत होईल पण असे अजून तरी काही घडले नाही.. प्रत्येक आपत्तीचा राजकारणासाठी उपयोग केला गेला आहे. तेव्हा नदीला जाणताना काही फर्म उपाय काढता येतो का बघा नाही तर नुसता स्टंट नको.
उत्तर द्याहटवा