तासगाव:तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या विळख्याचा मुद्दा अखेर विधानसभेत घणाघाती पद्धतीने घुमला. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्धा तास चाललेल्या चर्चेत या गंभीर प्रश्नावर ठोस आवाज उठवत परिसरातील वाढती नशेची समस्या आणि अवैध धंद्यांचा बेमालूम विस्तार उघडकीस आणण्यात आला.
गांजा आणि इतर अमली पदार्थांचा वाढता वापर लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे वास्तव सभागृहासमोर मांडण्यात आले. यामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असून पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. “ही फक्त कायद्याची नाही, तर समाजाच्या भवितव्याची लढाई आहे,” असा ठाम सूर यावेळी उमटला.यासोबतच तासगाव-कवठेमहांकाळ भागात खुलेआम सुरू असलेला आकडे जुगार आणि अवैध वेश्याव्यवसाय या विषयांवरही जोरदार चर्चा रंगली. या गैरप्रकारांकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत आहे का, आणि यामध्ये काही प्रमाणात पोलिसांचे पाठबळ आहे का, असा थेट आणि गंभीर सवाल सभागृहात उपस्थित करण्यात आला.या सर्व पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, संबंधित विषय गांभीर्याने घेत लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिल्याने या प्रश्नावर लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या