कुंडल प्रतिनिधी : क्रांती साखर कारखाना कार्यस्थाळावरील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूसाहेब लाड यांच्या समाधीस्थळी सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांनी मंगळवारी भेट देऊन आदरांजली अर्पण केली. तसेच स्वातंत्रलढ्यात जी. डी. बापूंनी दिलेल्या योगदानाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी उभारण्यात आलेल्या म्युझिअमची सुद्धा त्यांनी पहाणी केली. यावेळी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार तसेच प्रांताधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. लाड यांच्या कार्याला अभिवादन केले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूसाहेब लाड यांनी सहकार, शिक्षण, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात दिलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचा ठसा आजही समाजजीवनावर उमटलेला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला बळ देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्याचे काम त्यांनी केले. सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांना आर्थिक बळ मिळवून देत सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाने डॉ. लाड यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांवर चालत समाजहिताचे कार्य करण्याची भावना व्यक्त केली. प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामे करताना समाजातील वंचित घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असेही मान्यवरांनी नमूद केले.
समाधीस्थळी वातावरण अत्यंत भावपूर्ण झाले होते. मान्यवरांनी काही काळ शांत उभे राहून क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूसाहेब लाड यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी क्रांती साखर कारखान्याचे सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या