राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आक्रमक भूमिका घेत भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने आपल्या मित्रपक्षांनाच धक्का दिल्याने शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सभागृहात गंभीर आरोप करत लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत दोन सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले. “राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला,” असा थेट आरोप त्यांनी केला.
यावेळी शिंदे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी झालेल्या संवादाचा उल्लेख करत, मतदानाच्या आदल्या दिवशीच कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते, असे स्पष्ट केले. “मतदानानंतर कायदेशीर कारवाई करा, पण कोणालाही मतदानापासून रोखू नका,” असे सांगूनही संबंधित सदस्यांना मतदान करू दिले गेले नाही, असा दावा त्यांनी केला.
तसेच, या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली होती, तरीही प्रत्यक्षात पोलिसांनी सदस्यांना ताब्यात घेऊन मतदान रोखले, असा गंभीर आरोप शिंदेंनी केला. “मंत्री, आमदार यांचाही विचार न करता जणू आरोपींप्रमाणे वागणूक देण्यात आली,” असे म्हणत त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.
दरम्यान, शिंदेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. “उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून सातारा जिल्हा परिषद प्रकरण आता राज्याच्या राजकारणात मोठा मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या