वाळवा प्रतिनिधी: पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्याजवळ जन्मजात प्रचंड आत्मविश्वास होता. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये त्यांनी प्रत्येक मोहीम यशस्वी केली. असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. ते रविवार दिनांक २२ मार्च रोजी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने आयोजित क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १४ व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .अध्यक्षस्थानी वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष ,माजी मंत्री ,आमदार विनयरावजी कोरे (सावकार) हे होते.
प्रा बानुगडे पाटील पुढे म्हणाले की, क्रांतिवीर अण्णांच्यावर त्यांच्या आई लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या राष्ट्रीय जाणीवेचे संस्कार झाले होते. अण्णांच्या मनामध्ये आईनेच स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःला झोकून देण्याचे संस्कार केले. यशस्वी माणसाच्या पाठीमागे त्याच्यावर संस्कार करणारी आई ही खूप महत्त्वाची असते.
अण्णांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये निर्भयपणे ,जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा उभा केला. महात्मा गांधींच्या चले जाव या आंदोलनातून प्रेरणा घेऊन, अण्णांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना केली. स्वातंत्र्यापूर्वीच लोकशाहीचे प्रारूप त्यांनी दक्षिण साताऱ्यामध्ये निर्माण केले. इस्लामपूरच्या कचेरीवर मोर्चा काढलेला असताना, अण्णांच्या दोन साथीदारांच्या वर गोळीबार झाला. हजारो स्वातंत्र्य सैनिकांना बंदूकधारी पोलीस थोपवू शकतात हे लक्षात आल्यानंतर ,अण्णांनी सशस्त्र क्रांती करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यानी, गोव्याला जाऊन बंदुका आणल्या. सवंगड्यांना घेऊन फौजी प्रशिक्षण सुरू केले.
स्वातंत्र्य चळवळीसाठी पैसे कमी पडू लागल्यानंतर शेनोली ट्रेन आणि धुळ्याचा खजिना लुटला. त्याचबरोबर गिल्बर्ट सारख्या अत्यंत राक्षसी वृत्तीच्या अधिकाऱ्याच्या हातावर ही त्यांनी तुरी दिली. तसेच सातारचा जेल फोडला. यासारखे अनेक पराक्रम त्यांनी प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर केले. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ही त्यांनी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून, रचनात्मक काम उभे केले. हजारो तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे अण्णा म्हणजे चॅम्पियन एटीट्यूड असलेले स्वातंत्र्य सैनिक होते.
आयुष्यभर त्यांनी गोरगरीब, दलित, आदिवासी, वंचित, शेतकरी, कष्टकरी ,कामगार यांच्यासाठी आयुष्य वेचले. अण्णांच्या इतका देशभक्त मी उभ्या आयुष्यात पहिला नाही असेही बानुगडे पाटील म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री,आमदार विनयरावजी कोरे म्हणाले की, अण्णांच्या कुटुंबाचे आणि कोरे कुटुंबाचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे ते अधिक दृढ झाले .अण्णांनी वाळव्याच्या भागांमध्ये ,सहकाराच्या माध्यमातून, नंदनवन फुलवले ,तर तात्यासाहेब कोरे यांनी वारणेच्या माळावर नंदनवन फुलवले. अशी त्यागी मनोवृत्तीची माणसे अलीकडच्या कालखंडामध्ये दुर्मिळ झाली आहेत. नव्या पिढीने यांचा आदर्श घ्यावा .
सुरुवातीला गीत वैभव कला मंचच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .स्वागत आणि प्रास्ताविक हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे मार्गदर्शक ,कारखान्याचे चेअरमन मा वैभवकाका नायकवडी यांनी केले. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उघडून दाखवले आणि तरुणांनी अण्णांच्या विचारांचा वारसा चालवला पाहिजे .असे प्रतिपादन केले .
या वेळेला युवक नेते गौरव नायकवडी म्हणाले अण्णांनी संघर्ष करून संस्था उभा केल्या. अण्णांच्या कार्याचे स्मरण राहावे म्हणून टेंभू योजनेला अण्णांचे नाव द्यावे . कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब नायकवडी यांनी मानले. तर सूत्रसंचालन राजा माळगी यांनी केले. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे माजी चेअरमन महादेव कांबळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कारखान्याचे व्हा चेअरमन ज्ञानदेव भाडळकर, युवा नेते वीरधवल नायकवडी, प्राचार्या सुषमा नाईकवडी ,सौ नंदिनी नायकवडी ,जि प सदस्य संताजी मेटकरी पं स सदस्य प्राची अहिर, रूपाली पाटील हुतात्मा बाजारचे चेअरमन दिनकर बाबर ,हुतात्मा पतसंस्थेचे चेअरमन अजित वाजे ,सरपंच संदेश कांबळे हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहातील संस्थांचे आजी-माजी चेअरमन संचालक, पदाधिकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी पाटील अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या