प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा – १” राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मंडळ स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन उद्या दि.१४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय परिसरात करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा एकाच ठिकाणी व त्वरित उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण,भूसंपादन प्रकरणांतील पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, सातबाऱ्यातील त्रुटी दुरुस्त करून दुरुस्त सातबारा देणे, तसेच “जिवंत सातबारा” मोहिमेअंतर्गत वारस नोंदी, अ.पा.क. व ए.कु.मॅ. नोंदी कमी करणे, नजर गहाण नोंदींबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.यासोबतच डिजिटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती, अकृषक तरतुदींतील सुधारणांबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी सेवा, अॅग्री स्टॅक नोंदणी,पीएम किसान योजनेशी संबंधित कामे तसेच नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारणही या शिबिरात करण्यात येणार आहे.नागरिकांना पारदर्शक,जलद आणि सुलभ शासकीय सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून,शिबिरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
तरी मणेराजुरी मंडळातील सर्व नागरिक व शेतकरी बांधवांनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या