सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजना आहेत. कृष्णा नदीमधून सदर तीनही उपसा सिंचन योजनांसाठी पाणी उचलले जाते. तसेच या योजनांच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून पाण्याची तरतुद केली जाते. तसेच म्हैसाळ योजनेसाठी कोयना व वारणा या धरणातील पाण्याची तरतुद करण्यात आली आहे. सध्याचा कोयना धरणाचा जिवंत पाणीसाठा हा ६४.७४ टी.एम.सी. इतका व वारणा धरणाचा जिवंत पाणीसाठा हा १७.७७ टी.एम.सी. इतका आहे. सध्या कोयना धरणातून २१०० क्यूसेक्स पाणी KDPH टप्पा १ व २ मधून सोडलेले आहे. तसेच वारणा धरणातून १७७० क्यूसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
सध्या वाढता उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची/ सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आहे. दरवर्षी साधारणतः दिनांक १५ मार्च. पासून धरणाच्या नदी विमोचकामधून (River Sluice) १००० ते १५०० क्यूसेक्सने पाणी सोडल्यास व KDPH मधून २१०० क्यूसेक्स असे एकूण ३६०० क्यूसेक्सने कोयना धरणातून विसर्ग सोडण्यात येत असतो. परंतु सद्यःस्थितीत धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोयना धरणाच्या Stilling Basin च्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदर काम साधारणतः दिनांक १८ मार्च, २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामामुळे कोयना धरणाच्या नदी विमोचकामधुन १००० ते १५०० क्यूसेक्स विसर्ग सोडता येवू शकत नाही. सदर अधिकचा १५०० क्यूसेक्स चा विसर्ग नदी विमोचकामधुन न मिळाल्यामुळे फक्त KDPH मधून २१०० क्यूसेक्सने नदीपात्रात सोडण्यात येतो.
यानंतर प्रथम टप्प्यात कोयना नदीच्या कोयना धरणापासून कृष्णा नदी संगमापर्यंत कोयनेच्या सिंचन क्षेत्र/पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, उद्योगांस लागणारा पाणी पुरवठा याकरीता पाणी वापर करण्यात येतो. तसेच संगमानंतर टेंभू बॅरेजपर्यंत या भागातील सिंचन व औद्योगिक व पिण्यासाठीच्या गरजा तसेच टेंभू उपसा सिंचन प्रकल्प साठी उचलावे लागणारे पाणी इत्यादीसाठी पाणी वापर होतो. यापुढे ताकारी योजनेसाठी साटपेवाडी बंधाऱ्यावरील सिंचनासाठी, या भागातील सिंचन / बिगर सिंचनासाठी लागणारे पाणी यासाठी पाणी वापर होत असतो. या नंतरच्या टप्प्यांमध्ये कृष्णा नदीवरील बंधारे (बहे, वसगडे, डिग्रज) तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी म्हैसाळ को.प. बंधारा, राजापूर को.प. बंधारा या भागासाठी सिंचन व बिगरसिंचनासाठी लागणारे पाणी या सर्व गरजा या कोयना धरणातून सोडलेला २१०० क्यूसेक्स विसर्ग व वारणेतून येणाऱ्या १७७० क्यूसेक्सपैकी दानोळी बंधाऱ्यातून प्रत्यक्ष मिळणाऱ्या ८०० क्यूसेक्स इतक्याच विसर्गावर पिण्यासाठी, नदीवरील सिंचन, औद्योगिक व उपसा सिंचन योजनांसाठी लागणारे पाणी इत्यादी गरजा भागवाव्या लागत आहेत.
उपरोक्त परिस्थिती व कोयना Stilling Basin दुरुस्तीमुळे धरणातील मर्यादीत विसर्गामुळे टेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिनही योजनांचे पंप हे मर्यादीत संख्येमध्ये सध्या चालू आहेत. सद्यःस्थितीत पंपगृह टप्पा १ मध्ये टेंभू योजनेचे १६ पंप, ताकारी योजनेचे ८ ते १० पंप व म्हैसाळ योजनेचे १३ ते १४ पंप अशा प्रकारे टेंभू योजनेचे ५३%. ताकारी योजनेचे ६३% व म्हैसाळ योजनेचे ५०% इतके पंप सुरु आहेत.
साधारणतः दि.१८ मार्च, २०२६ पर्यंत कोयना धरणाच्या Stilling Basin चे दुरुस्ती चे काम झालेनंतर दि.१९ मार्च, २०२६ पासून कोयनेच्या नदी विमोचकामधुन आवश्यकतेप्रमाणे १००० ते १५०० क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात येत असून त्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये टेंभू, ताकारी व म्हैसाळ या योजना पूर्ण क्षमतेने चालवून उर्वरीत उन्हाळी हंगामामध्ये पंप पूर्ण क्षमतेने चालू करणेचे नियोजन आहे.
तरी जलसंपदा विभागाच्या टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे लाभार्थी, नदीवरील सिंचन / बिगर सिंचन (पिण्यासाठी व औद्योगिक) ग्राहकांना या द्वारे आवाहन करण्यात येत आहे की, या ८ दिवसांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करावा. कोयना धरणामधून दिनांक २० मार्च, २०२६ पासून जादा क्षमतेने पाणी पुरवठा करणेचे नियोजन करणेत येत आहे. असे
सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चं. हि. पाटोळे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या